जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

शेतकरी धास्तावला

by Team Satara Today | published on : 22 October 2024


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजल्याने नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असून, रात्रीच्या वेळी जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राजवाडा, खणआळी, मोती चौक, राजपथ, गोल बाग, पोवईनाका, भाजी मंडई परिसर, बसस्थानक परिसर, बॉम्बे रेस्टारंट परिसरात असणार्‍या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. तासभर शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असल्याने शेतशिवारामध्ये शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मात्र पावसामुळे सोयाबीन, घेवडा व अन्य कडधान्ये भिजली असल्याने त्यांना कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली आहेत, तर काही ठिकाणी पिके सडून गेली आहेत. या पावसाने रब्बी हंगामातील मशागतीची कामे व गहू पेरणीला अडचणी येऊ लागल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम कंपनीच्या आडमुठेपणामुळे ठप्प
पुढील बातमी
पहिल्या यादीत नाव न आल्याने भाजप इच्छुकांची वाढली धाकधूक

संबंधित बातम्या