सातारा : सत्ताधारी महायुतीच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भात बोलताना त्यांनी संविधान प्रचार व प्रसारक, व लोकायत करत असलेली सडक नाट्ये यावर नाव घेऊन टीका केली आहे. सरकार पक्षाकडून जनसुरक्षा विधेयक संमत करण्यासाठी अशा काही बाबी उगाचच बाऊ करून पुढे आणुन आणि या जनसुरक्षा विधेयकाची किती गरज आहे हे दाखवण्यासाठीच सरकार पक्षातर्फे कायंदे यांना बोलायला लावले आहे. असे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते कॉ अविनाश कदम (मुंबई) व वारी समतेची या पुस्तकाचे लेखक कॉ विजय मांडके (सातारा) यांनी म्हटले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते कॉ अविनाश कदम व विजय मांडके यांनी म्हटले आहे की मनीषा कायंदे यांना बोलण्यास भाग पाडण्यामागचे डोके कोणाचे आहे हे सांगायची गरज नाही. वारकरी संप्रदाय हा संविधानाच्या गाभ्यात असलेल्या समता , बंधुता , न्याय, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला संप्रदाय आहे आणि ज्यांना अर्बन नक्षलवादी म्हणून मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे ते संविधानाचाच प्रचार करत आहेत. म्हणजेच वारकरी संतांच्याच विचाराचा प्रचार करत आहेत त्यामुळे त्यांनी असली किडेगिरी बंद करावी.
पुणे येथे गेल्या वर्षी वारीमध्ये धारकरी तलवारी घेऊन शिरले होते. तेव्हा त्यास वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता आणि ते या परंपरेतील नाहीत असे स्पष्टपणे सांगितले होते. ते खरे तर नक्षलवादी म्हटले पाहिजे का असा सवाल कॉ अविनाश कदम व कॉ विजय मांडके यांनी केला आहे.
भारतीय संविधानाचा प्रचार वारीमध्ये करणे गैर नाही. कारण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मूकनायकचे ध्येयधोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या पुढील ओव्या छापल्या होत्या.
काय करू आता धरुनिया भीड |
निःशंक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |
सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||
संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात की, बलवानाची गाठ पडली असता त्याला बलपूर्वक प्रतिसाद द्यायला हवा. मग तो देव का असेना हे अस्सल संदर्भ मनीषा कायंदे यांनी पहावेत उगाच माहिती नसताना त्यात लक्ष घालू नये असे आवाहनही अविनाश कदम यांनी केले आहे.
मनिषा कायंदे यांना वारकरी संप्रदाय व वारकरी परंपरा काय आहे याची बहुदा कल्पना नसावी. वारकरी संप्रदाय हा कोणत्याही धर्माचा पाईक नाही तर तो मानवतेचा पाईक आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. तसेच आमदार मनीषा कायंदे यांच्या विधानाचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र तीव्र निषेध करत आहे. वारीत वारकरी संतांच्या विचाराचे व संविधानाच्या आचरणाच्या प्रबोधनाचे काम करणाऱ्यांवर अर्बन नक्षलवादी म्हणून कारवाई झाल्यास विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असेही कॉ अविनाश कदम, मुंबई व कॉ विजय मांडके सातारा यांनी म्हटले आहे.