कोयनानगर : कोयना धरणाने गुरुवारी अर्धशतकी पाणीसाठ्याचा टप्पा पार केला. धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यांतील अवघ्या नऊ दिवसांत धरणातील साठ्यात तब्बल ३६ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटत होता. जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली. पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने जलाशयातील साठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि धरणाने ५० टीएमसीचा टप्पा पार केला.
यामध्ये मंगळवारी पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडल्याने धरणात येणारी पाण्याची आवक ९३ हजार क्युसेकपर्यंत पोहोचली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत कोयना येथे १,६३२, नवजा १,९११, तर महाबळेश्वर येथे २,३२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.