सातारा : शहरातील बांधकाम भवन, जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनधिकृत अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि वाहतूक शाखेच्या वतीने आज संयुक्त धडक कारवाई करण्यात आली.
या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर अनेक व्यावसायिकांनी छोटी-मोठी दुकाने थाटून अतिक्रमण केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड होत असून वाहनचालकांनाही वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारी लक्षात घेऊन पीडब्ल्यूडीचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई सुरू केली.कारवाईदरम्यान रस्त्यावर ठेवलेले साहित्य, वजन काटे आदी साहित्य जप्त करण्यात आले. काही दुकानदारांनी कारवाईला विरोध करत पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई पूर्ण केली.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांतही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. शहरातील फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वाहतूक पोलिसांच्या वतीने सर्व व्यावसायिकांना स्वयंप्रेरणेने अतिक्रमण हटवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.