सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (वायसीआयएस) वसतिगृहातील विद्यार्थिनी सृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंबळे, ता. महाबळेश्वर) हिच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची रयत शिक्षण संस्थेने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण घटनाक्रमाच्या वस्तुनिष्ठ तपासणीसाठी तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि वायसीआयएसचे प्राचार्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सृष्टीने १ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. संस्थेच्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्याबाबत कौटुंबिक तणावासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती आणि ही बाब पालकांपर्यंत पोहोचल्याने ती नाराज होती, त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र मृत्यूचे नेमके कारण पोलिस तपास आणि समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे डॉ. म्हस्के यांनी नमूद केले.
या प्रकरणाची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद असून चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही दोषारोप करणे अथवा कोणाला निर्दोष ठरविणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे. संबंधित चौकशी समिती पुढील सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार असून, त्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर व प्रशासकीय पावले उचलली जातील. चौकशीत कोणाचाही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर वसतिगृह अधीक्षकांनी रजा घेतली असून, तेथील सुमारे दोनशे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी संस्थेने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वसतिगृहातील सुरक्षेचा फेरआढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी आणि कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लावून धरली असून संस्थेने या मागण्यांची गांभीर्याने नोंद घेतली आहे.
सृष्टी बिरामणे मृत्यू प्रकरण : रयत शिक्षण संस्थेकडून तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत
वसतिगृहात संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा