शिक्षक बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांचा विश्वास आणि सहकार्य-हेच खरे बळ - चेअरमन विजय ढमाळ, प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा उत्साहात

by Team Satara Today | published on : 06 July 2026


सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा उत्साहात झाली. प्रास्ताविकात चेअरमन विजय ढमाळ यांनी शिक्षक बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांचा विश्वास आणि सहकार्य-हेच खरे बळ असल्याचे सांगितले. बँकेच्या वाटचालीत योगदान देणारे माजी चेअरमन, आजी-माजी व्हा. चेअरमन, संचालक, खातेदार आणि सभासदांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विजय ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात निष्क्रिय सभासदांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी संचालक मंडळाने "अभिनव कर्ज योजना" सुरू केली. या योजनेंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध करून बँकेने निष्क्रिय सभासदांना पुन्हा बँकेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सभासदांच्या मागणीनुसार ही योजना पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती श्री. ढमाळ यांनी दिली.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध मदत निधीतून मयत सभासदांच्या वारसांना बँकेकडून ३ कोटी ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली.

संचालक मंडळाच्या प्रभावी नियोजनामुळे गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये, कर्जामध्ये तसेच गुंतवणुकीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्पर्धेच्या काळात सहकार तत्व जपत सभासद व खातेदारांचा विश्वास कायम ठेवून बँकेचा नावलौकिक अधिक वाढविण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे मत व्हा. चेअरमन नितीन फरांदे यांनी व्यक्त केले. सभासदांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय मदत रकमेची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली. या निर्णयाचे उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

सभेस संचालक ज्ञानब ढापरे, नितीन काळे, किरण यादव, पुष्पलता बोबडे, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे, तज्ञ संचालक अमित निकम व सुनिता वकील, मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब्ब भोसले तसेच सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवट व्हा. चेअरमन नितीन फरांदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुसळधार पावसाने सज्जनगडावर दरड कोसळली; गडावरील वाहतुकीवर परिणाम
पुढील बातमी
अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा कोटा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारला सादर; नौदल, हवाई दलाचा सरकारला प्रस्ताव

संबंधित बातम्या