पहिलाच चित्रपट फ्लॉप, अभिनय सोडून अमेरिकेला गेला

'पुष्पा 2' चित्रपट ठरला गेमचेंजर

by Team Satara Today | published on : 07 August 2025


साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता फहाद फासिल 8 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. सध्या तो यशाच्या शिखरावर पोहोचला असला तरी त्याचा प्रवास खडतर होता. अपयशाने खचून न जाता त्याने स्वतःच्या चुकांमधून शिकत फहादने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फहाद फासिल हे प्रसिद्ध दिग्दर्शक फाजिल यांचे चिरंजीव आहेत. वडिलांनीच त्याला 2002 मध्ये ‘Kaiyethum Doorath’ या रोमँटिक चित्रपटातून लॉन्च केलं. यात त्याने सचिनची भूमिका साकारली होती आणि त्याच्या सोबत निकिता ठुकराल प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण तो फ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी चित्रपटालाच नाही तर फहादच्या अभिनयालाही नाकारलं होतं. त्यावेळी फहादवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊन फहाद हा अमेरिकेला गेला होता. फहाद जेव्हा अमेरिका गेला तेव्हा त्याचे वय फक्त 20 वर्ष होते. नंतर एका मुलाखतीत त्याने सांगितले की, अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी पुरेशी तयारी न करता इंडस्ट्रीत आलो. त्यामुळे तो माझा दोष होता.

अमेरिकेत काही वर्ष राहून फहादने स्वतःमध्ये बदल घडवले आणि 2009 मध्ये तो पुन्हा भारतात परतला. 2009 मध्ये आलेल्या ‘केरळ कॅफे’मधून त्याने पुनरागमन केलं. त्यानंतर ‘प्रमणी’, ‘कॉकटेल’सारख्या चित्रपटांनी त्याला थोडीफार प्रसिद्धी मिळवून दिली. पण खऱ्या अर्थाने फहादला 2011 मध्ये आलेल्या ‘Chaappa Kurishu’ मधून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने  ‘इंडियन रुपये’, ‘22 फीमेल कोट्टायम’, ‘डायमंड नेकलेस’, ‘D Company’, ‘Take Off’, ‘मनी रत्नम’, ‘Trance’, ‘सी यू सून’, ‘सुपर डिलक्स’, ‘कार्बन’ यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची चांगली साद मिळाली. फहादचा अभिनय ‘अवेशम’ आणि ‘पुष्पा 2’मध्ये झळकला आणि यामुळे त्याचं नाव भारतातील कोनाकोपऱ्यात पोहोचलं. ‘पुष्पा 2’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

आता फहाद फासिल लवकरच ‘Odum Kuthira Chaadum Kuthira’, ‘Don’t Trouble The Trouble’, ‘कराटे चंद्रन’ यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटांत दिसणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गरम तेलाने डोक्याला मसाज केल्याने तुमचे केस होतात सुंदर आणि निरोगी

संबंधित बातम्या