आर्थिक व्यवस्थापनासाठी 'कृष्णा'ला सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार

कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र विभागातील सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विनायक भोसले यांच्यासह संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.

पुणे येथील कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते.

कारखान्याने गेली १० वर्षे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. कृष्णा कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामात एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च (६००.२० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या एकूण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चापेक्षा (८०५.०४ रुपये प्रति क्विंटल) कमी ठेवत, उत्कृष्ट नफा निर्देशांक राखला आहे. तसेच कारखान्यातील साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च (४४६.७९ रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्चापेक्षा (५४१.९२ रुपये प्रति क्विंटल) कमी आहे. याशिवाय खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्चदेखील (८३.१० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या प्रति क्विंटल खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा (१०९.८० रुपये प्रति क्विंटल) कमी राखत, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन केले आहे.

कारखान्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्याला प्रदान केला. यावेळी कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, जे.डी.मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे, मनोज पाटील, वैभव जाखले, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, चीफ अकौंटट पंडित झांझुर्णे, अकौंटट संदीप भोसले आदींची उपस्थिती होती. 

मागील बातमी
आयुष विभागामार्फत योगग्राम सांबरवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न
पुढील बातमी
राज्यस्तरीय आदर्श मार्गदर्शक पुरस्काराने संदीप दीक्षित महाराज सन्मानित

संबंधित बातम्या