सातारा : ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने आज अलंकार हॉल, सातारा येथे हिंदू-मुस्लिम शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस मौलाना, मशिदींचे ट्रस्टी, शांतता समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सध्या वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीस बँक खात्याचा पासवर्ड, ओटीपी किंवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये. मोबाईलवर आलेल्या अनोळखी Aझघ फाईल्स ओपन करू नयेत, तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकला क्लिक करून मोबाईलचा एक्सेस देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या. अनधिकृत संकेतस्थळे किंवा संशयास्पद मेसेजमधील लिंक उघडू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलीस पाटील यांनी गावांमध्ये निष्पक्ष भूमिका ठेवावी आणि कोणत्याही राजकीय पक्ष अथवा संघटनेची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. गावात फिरणारे पिंगळे, फेरीवाले तसेच अनोळखी व्यक्ती यांची आवश्यक ती शहानिशा करून सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. मंडळांनी पोलीस प्रशासन व संबंधित कार्यालयांची आवश्यक परवानगी घेऊनच उत्सवाचे आयोजन करावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणार्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस सातारा शांतता समितीचे सदस्य शफीक शेख, राजेंद्र बर्गे, आयुब शमशुद्दीन मोकाशी, मशिदींचे ट्रस्टी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील यांच्यासह सुमारे 75 ते 95 नागरिक उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, शांतता आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परस्पर समन्वय राखण्याचे आवाहन करण्यात आले.