धरणग्रस्तांकडून कराडमध्ये ठिय्या आंदोलन

प्रीतिसंगमावर जोरदार घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 13 March 2025


कराड : प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने निवेदन देत आंदोलन करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच कोयना धरणग्रस्तांनी स्व. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळ परिसरात बुधवारी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात ना. अजित पवार यांनी येऊनही धरणग्रस्तांना भेट न दिल्याने धरणग्रस्तांकडून आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात सन 1960 च्या दशकात कोयना धरणग्रस्तांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत धरणासाठी जमिनी दिल्या होत्या. मात्र आजवर या धरणग्रस्तांना न्याय मिळाला नसून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळेच बुधवारी कराडमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात कोयना धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात अभिवादन करण्यासाठी आले होते. 

अभिवादन केल्यानंतर किमान काही वेळ ते धरणग्रस्तांच्या व्यथा व समस्या जाणून घेतील, अशी अपेक्षा कोयना धरणग्रस्तांना होती. मात्र त्यापूर्वीच एका धरणग्रस्तांस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आणि त्यामुळे धरणग्रस्तांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेत प्रीतिसंगम बागेच्या प्रवेशद्वारानजीक बाहेरील बाजूस जोरदार घोषणाबाजी केली. तसेच याच परिसरात ठिय्या आंदोलन करत राज्य शासनासह प्रशासनाचा निषेध नोंदविला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रयत संघटनेच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय
पुढील बातमी
खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्स सातारा यांचा संयुक्तपणे सुरक्षा दिन-सप्ताह

संबंधित बातम्या