सातारा : जेवण चांगले केले नाही म्हणून अंगावर रॉकेल ओतून आजीला जाळून मारल्याप्रकरणी राजापुरी (ता. सातारा) येथील नातवाला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली.
शरद बजरंग साळुंखे (वय 36, रा. राजापुरी, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या नातवाचे नाव आहे, तर गीताबाई मारुती साळुंखे (वय 78) असे मृत आजीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 11 सप्टेंबर 2019 ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला होता. दुपारी तू जेवण चांगले का केले नाहीस, म्हणून शरद याने चुली शेजारील रॉकेलच्या बाटलीतील रॉकेल आजीच्या अंगावर ओतले. त्यानंतर काडीपेटीची काडी पेटवून आजीला पेटवले. यात त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या. गीताबाई यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या जबाबानुसार शरद साळुंखेवर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. व्ही. हंकारे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश जोशी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.
खटल्या दरम्यान दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश जोशी यांनी शरदला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
आजीला जाळून मारल्याप्रकरणी नातवाला जन्मठेप व दंड
by Team Satara Today | published on : 14 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा