शेकोटी उत्सवाच्या निमित्ताने बालपणीच्या आठवणीत रमल्या अंगणवाडीताई: महाराष्ट्रातील पहिला अनोखा उपक्रम साताऱ्यात

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा : अंबवडे बुद्रुक येथील रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय शेकोटी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.. यामध्ये अकराशेहुन अधिक सेविकां, मदतनीसताईनी सक्रिय सहभाग नोंदविला. 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये महिलांसाठी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिला हा अनोखा उपक्रम संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे उपस्थित होते, त्यांनी आपल्या मनोगतात सदर उपक्रमातून अंगणवाडीताई,मदतनीसताई या बालपणांमध्ये रमल्याचे सांगत दैनंदिन कामकाजामध्ये  त्यांचा उत्साह निर्माण करून देणाऱ्या अनोख्या उपक्रमाचे  कौतुक केले.

उपक्रमामध्ये चिंचोके चल्लस, काच कवड्या, बिटक्या, गजगे, गोटया व गल्ल्या, चोर पोलीस शिपाई, काच पुरणी, अशा  बैठ्या खेळांचे स्टॉल उभारणी केलेली असून  झिबल्या, विषामृत, तळ्यात मळ्यात, काठीने टायर फिरवणे, आबाधबी, आंधळी कोशिंबीर, बस फुगडी, लगोर, अशा विस्मरणात गेलेल्या खेळांचे आयोजन केले होते. सर्वच खेळात सहभागी होत महिलांनी मनसोक्त आनंद लुटला आणि आठवणींना उजाळा दिला. 

दुपारी चविष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंन्तर विसावा म्हणून गायनाच्या मैफिलीत विविध हिंदी मराठी लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा  जागर होणे  क्रमप्राप्त होते. 

तारळे येथील सुप्रसिद्ध दांडपट्टा कोच श्री अडागळे सर यांचे किशोरी मुलींचे दांडपट्टा व साहसी खेळांचे प्रत्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लाठीकाठी, भाला, तलवार, दांडपट्टा फिरवत, कांदा, बटाटा, नारळ, लिंबू अश्या वस्तूंचा अचूक भेद साधने. त्याचं बरोबर आगीचे गोळे डोक्यावरून व शरीराभोंवती फिरवणे, अशे चित्त थरारक प्रात्यक्षिके उपस्थितांना रोमहर्षक असा अनुभव देत होते.

या सर्वांमध्ये दिवस कुठे निघून गेला कळाले नाही आणि सांजवेळेस मा जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे सर यांचे हस्ते शेकोटी प्रज्वलीत  केली गेली. शेकोटीची गाणी गात,  अशा सुंदर दिवसाची सांगता करून जड अंतकरणाने  सर्व अंगणवाडीताईनी आपापले घरी प्रस्थान केले. ज्याप्रमाणे चिमण्यांची शाळा भरते, त्याप्रमाणे हा दिवस एक आगळा वेगळ्या आठवणी सोबत देऊन गेला अशीच प्रतिक्रिया प्रत्येक ताईच्या मनात होती. 

सदर कार्यक्रम आयोजित करणे यशस्वी करण्यासाठी निलेश पाटील यांचे सहकार्य व लोकसहभाग मिळाला.बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, विस्तार अधिकारी पल्लवी बर्गे, अमोल कांबळे, तसेच प्रकल्प 1 व 2 च्या सर्व पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले. , सारिका ढाणे यांनी सूत्रसंचालन केले. नीता पाटील यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तासवडेमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील गटाला खिंडार; संजय जाधव यांच्यासह सोसायटीच्या सर्व संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश
पुढील बातमी
साताऱ्यात भक्तिरसात न्हाऊन निघाला श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा; ‎हजारो भाविकांनी घेतले दर्शन, टाळ मृदंगाच्या तालावर मिरवणूक

संबंधित बातम्या