कासाणी हद्दीत बारा ब्रासचा परवाना घेऊन शेकडो ब्रास माती व मुरूमाचे उत्खनन

by Team Satara Today | published on : 14 February 2026


सातारा  : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातील कास पठार परिसरातील निसर्गाची उत्खननाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हानी केली जात असून मौजे कासाणी गावच्या हद्दीत फक्त बारा ब्रासचा परवाना घेऊन शेकडो ब्रास माती व मुरूमाचे उत्खनन सदर ठिकाणी सुरू आहे. साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतील काही धनिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि वृक्षतोड सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सातारा पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. 

सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ कास पठार… दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारे हे जैवविविधतेचे केंद्र आता उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे धोक्यात आले आहे.

कास पठाराच्या पायथ्याशी असलेल्या कासानी गावाच्या हद्दीत पुणे मधील एका धनिकासह सातारा पीडब्ल्यूडीच्या विद्युत शाखेतील अधिकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड झाले आहे. सदर कामासाठी तहसीलदार सातारा यांनी फक्त बारा ब्रासचा परवाना दिला असून संबंधितांनी केवळ १२ ब्रास उत्खननाची परवानगी घेतल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली असता तब्बल २५० ते ३०० ब्रासपर्यंत उत्खनन झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून वारसा स्थळाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून त्यामुळे आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. सदर उत्खनन परवानगी देताना हे काम 27 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यानच करण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात ही उत्खनन सुरू होते. सदर उत्खनन करताना झाडे तोडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात ही परवानगी घेतली आहे की नाही हे गुलदस्त्यातच आहे. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावात भरधाव कारची एसटी बसला धडक; मारुती कार चालकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

संबंधित बातम्या