कराड : मागील पाच महिन्यात मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघडकीस आणण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या संशयिताने अल्पवयीन मुलीच्या मदतीने चोर्या केल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीस गेलेले 14 लाख 80 हजारांचे सुमारे 18.5 तोळे सोने हस्तगत केले असून संशयिताचा आणखी काही गुन्ह्यात हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर येथील हा चोरटा आहे. फेब्रुवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत कराड शहरासह परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजसह अन्य बाबींवर काम करत संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याने त्याच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने पाच घरफोड्या केल्या असून त्याच्याकडून सुमारे 14 लाख 80 हजारांचे 18.5 तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.