प्रतापगड नजीक भीषण अपघात; अंबेनळी घाटात ३०० फूट दरीत कोसळून वाईतील दाम्पत्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 24 April 2026


महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान असलेल्या अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याचा दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) अशी या अपघातात प्राण गमावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य हे भंगार व्यवसायानिमित्त पोलादपूर येथे गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून वाईकडे परतत असताना, महाबळेश्वरपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या प्रतापगडच्या कमानीनजीक त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला. दुचाकीवर असलेल्या भंगार साहित्याच्या गाठोड्यांमुळे संतुलन बिघडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगमधील मोकळ्या जागेतून थेट दरीत झेपावली. यावेळी दुचाकी रस्त्याच्या कडेलाच अडकली, मात्र वेगामुळे चव्हाण दाम्पत्य सुमारे ३०० फूट खोल दरीत फेकले गेले.

​अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा काळोख आणि खोल दरी अशा प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू टीमने थरारक बचाव मोहीम राबवली. दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून जवानांनी दोन्ही मृतदेह शोधून बाहेर काढले. या शोध मोहिमेत नगरसेवक कुमार शिंदे, सुनील भाटीया, अमित कोळी, सुजित कोळी, अनिकेत वागदरे, मृणाल उत्तेकर, ऋषीकेश जाधव, आशिष बिरामणे आणि जयवंत बिरामणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

​गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात दाम्पत्यांचे अपघाती मृत्यू होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यात दहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा, तर फलटण तालुक्यातील राजुरी येथे लग्नाला जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला होता. या पाठोपाठ आता अंबेनळी घाटात झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; जिल्हा परिषदेत नियोजनाचा 'मॅरेथॉन' आढावा

संबंधित बातम्या