कार्यमुक्तीसाठी बदली शिक्षकांची आर्त हाक

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा : शासनामार्फत सन 2025 मधील प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील अन्य जिल्हा परिषदांनी ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना कार्यमुक्त केले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी साहेब आम्हाला कार्यमुक्त करा, अशी आर्त हाक दिली आहे. प्रशासन शिक्षकांना तारीख पे तारीख देत असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांनी बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती आदेश निर्गमित केले आहेत. 

परंतु, राज्यात अग्रेसर व मार्गदर्शक असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने मात्र अद्यापही शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले नाहीत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता यामुळे कार्यमुक्ती प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदली प्रक्रिया रेंगाळली आहे. दुर्गम व डोंगराळ भागात काम करणारे शिक्षक, बदली झालेल्या महिला शिक्षिका, सर्वसामान्य शिक्षक कार्यमुक्तीची आस लावून बसले आहेत. परंतु, सातारा जिल्हा परिषद कार्यमुक्ती न करता तारीख पे तारीख जाहीर करत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

बदलीग्रस्त शिक्षकांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले. गोरे यांनी सीईओंना फोन करून आदेशही दिले होते. मात्र, अद्यापही योग्य कार्यवाही झाली नाही. कोरेगावचे आ. महेश शिंदे यांची भेट घेवून शिक्षकांनी गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी तत्काळ महेश शिंदे यांनी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांना शिक्षकांना आजच कार्यमुक्त करण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचीही बदलीग्रस्त शिक्षकांनी भेट देवून कार्यमुक्त करण्याची मागणी केली. न्यायप्रविष्ठ शिक्षक वगळून सर्व शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तसेच बदली झालेल्या शिक्षकांचे दोन प्रतिनिधींनी घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी भेट घडवून आणली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
ना. शिवेंद्रसिंहराजेमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

संबंधित बातम्या