कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा "कणा" व्हावे: यशेंद्र क्षीरसागर ; भुरकवडी शाळेत मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद

by Team Satara Today | published on : 28 February 2026


सातारा : " कवी कुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांनी ''कणा" या कवितेत कणखर विद्यार्थ्यांचे दर्शन घडविले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर प्रेम करून मराठी भाषेच्या विकासाचा कणा व्हावे",  अशा अपेक्षा खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा कार्यक्रम कटव तालुक्यातील भुरकवडी येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे तसेच; सर्व शिक्षक उपस्थित होते.

श्री.क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यांना ''कणा" कवितेचे महत्त्व सांगितले. श्री.क्षीरसागर म्हणाले," मराठी भाषा ही आपली केवळ मातृभाषा नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे मराठी भाषेच्या विकासामध्ये शिक्षक, विद्यार्थी, संशोधक अशा सर्वच घटकांचा सहभाग असायला हवा. मराठी भाषेचे केवळ मोठमोठे उपक्रम आणि कार्यक्रम ठेवून उपयोग नाही. तर सूक्ष्म पातळीवर प्रयत्न करून मराठी भाषेची गोडी वाढविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व आणि इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे.

मराठी भाषेमधील साहित्य किती विविध अंगी आहे आणि त्यामध्ये किती मोठे कार्य झाले आहे हे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तर त्यांना वाचनाची गोडी लागेल. आणि मराठी भाषेविषयी प्रेम वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांनी व्याकरणाचा धसका घेऊ नये. व्याकरण हे फक्त भाषेला वळण लावण्यासाठी घालून दिलेले नियम आहेत.भाषेची गोडी ही आपल्या संवादावर आणि वाचनावर अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करावे कथा कविता, एकांकिका, कादंबरी, आत्मचरित्र अशा सर्व साहित्य प्रकारांचा अभ्यास करावा आणि आवडते साहित्य प्रकारात आपला ठसा उमटवावा. प्रत्येकाने लेखक, कवी व्हावे असे नाही! तथापि उत्कृष्ट वाचक  झाले तर जीवनमूल्य समजतात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचे नटसम्राट नाटक तसेच विशाखा सारखे कवितासंग्रह मुलांनी आवर्जून वाचावेत. ग्रामीण, स्त्रीवादी ,दलित साहित्य असे सर्व साहित्य प्रवाह अभ्यासावे."

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची, परसबागेची श्री.क्षीरसागर यांनी पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपालिकेचे 597 कोटीचे शिलकी अंदाजपत्रक सादर; सर्वसाधारण सभेची मंजुरी : ३ लाख 38 हजार 347 रुपयांची शिल्लक
पुढील बातमी
भिलार येथे ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; ‘यशदा’च्या प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली काव्यरूपी कृतज्ञता

संबंधित बातम्या