सलग सुट्टयांमुळे पर्यटकांनी पाचगणी बहरली

by Team Satara Today | published on : 12 May 2025


पाचगणी : शाळांना पडलेल्या उन्हाळी सुट्ट्या तसेच सलग सुट्ट्या आल्याने रविवारी पर्यटकांनी पाचगणी बहरल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे एन उन्हाळ्यात पाऊस, धुके,थंडी,ऊन ढगाळ वातावरण असे वेगळे पण आल्हाददायक वातावरण पर्यटक अनुभवत आहेत. यंदा वाढलेले तापमान व उशीरा शाळांना लागलेल्या सुट्ट्यानंतर प्रथमच उन्हाळी हंगामात पाचगणीत पर्यटकांची वर्दळ दिसून आली. त्यामुळे टेबललँडसह विविध पॉईंटवर गर्दी दिसून आली. 

सलग सुट्टया अन् पाचगणी महाबळेश्वर हे जणू समीकरणच झाले असून मुंबई, पुणेसह विविध ठिकाणांहून पर्यटक आपल्या कुटुंबियांसह मित्रमैत्रणींसह येथे दाखल होतात. धकाधकीच्या वेळापत्रकातून निवांत वेळ काढून येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. उन्हाळी हंगामात पर्यटकांना अधूनमधून पावसाची बरसात धुकं, थंडी अन् ढगाळ असे वातावरण अनुभवायास मिळत आहे. मुलांना देखील शालेय सुट्टी असल्याने पर्यटकांना यंदा मज्जा करायला मिळाली आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेत अनेक पर्यटक पाचगणीकडे धाव घेत आहेत.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यवसायिकांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटकांनी पाचगणीतील प्रसिद्ध पर्यटक स्थळे, सह्याद्री पर्वतरांगा, टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि इतर निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यास प्राधान्य दिले आहे. मका कणीस, मका फ्रँकी अशा गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासोबतच आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी तसेच आईसगोला स्ट्रॉबेरी विथ क्रीम सारख्या थंडगार पदार्थांची पर्यटक चव चाखताना दिसत आहेत. टेबल लँड परिसरात घोडा गाडी, गोड्यावरून फेरफटका मारत आहेत. मुख्य बाजारपेठेत देखील सायंकाळी पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडक्या बहिणींना आता 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार : अजित पवारांची घोषणा
पुढील बातमी
हृदयक्रिया बंद पडल्यावरही होणार अवयवदान...

संबंधित बातम्या