मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'पारू'ने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरलेत. तर ही मालिकाही टॉप २० मध्ये आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे दिसत आहे. ती आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिच्या चाहत्यांची संख्या बरीच मोठी आहे. ती अनेकांची लाडकी आहे. मालिकेतील चुलबुली पारू प्रेक्षकांची आवडती आहेच मात्र आता शरयूने शेअर केलेला डान्सही चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. शरयूने तिच्या व्हिडिओमध्ये हलगीवर ठेका धरल्याचं दिसत आहे.
शरयूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत. यात शरयूचा मंगळागौरीसाठी सजलेला लूक दिसत आहे. मालिकेत सध्या मंगळागौरीचा ट्रॅक सुरू आहे त्यामुळे ती त्या सजलेल्या वेशात आहे. नऊवारी साडीमध्ये शरयू अतिशय सुंदर दिसत आहे. याच नऊवारी साडीत शरयू हलगीच्या तालावर नाचताना दिसतेय. तिने हलगीवर जबरदस्त असा डान्स केला आहे. तिचे ठुमके पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. तिची एनर्जी पाहून काही चाहते चकीत झाले आहेत.
शरयूच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. 'व्वा', खूप सुंदर, जबरदस्त, एक नंबर पारू, एकदम कडक अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. शरयूने यापूर्वी 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जयंत लाडेसोबत लग्नबंधनात अडकली. ३ एप्रिल २०२३ रोजी शरयूने लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने 'पारू' मालिकेतून कमबॅक केलं. तिची ही मालिकाही प्रेक्षकांचं मन जिंकतेय.