कुमठेतील शेळ्या चोरटे गजाआड करण्यात बोरगाव डीबीला यश; साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 05 April 2026


सातारा : कुमठे ( ता. सातारा) येथील शेळ्या चोरी प्रकरणातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात बोरगाव पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील टेम्पोसह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या घटनेची हकीकत अशी, कुमठे येथील शेळीपालक रामकृष्ण रघुनाथ दळवी दि. 21 रोजी रात्री शेळ्या शेडमध्ये कोंडून झोपी गेले. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना शेळ्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता चारजण एका टेंपोमध्ये शेळ्या भरत असल्याचे दिसले. त्याचवेळी चोरट्यांनी शेळ्या भरलेल्या टेंपोसह धुम ठोकली. दळवी यांनी शेड मध्ये पाहिले असता अकरा गाभण शेळ्या चोरीस गेल्याचे समजले. या संकरीत शेळ्यांची किंमत अडीच लाखांच्या घरात आहे. यानंतर दि 1 रोजी त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सपोनि प्रशांत हुले यांनी डी. बी पथकास चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. अखेर दोनच दिवसात चोरीस गेलेल्या शेळ्या व त्याची वाहतूक करणारा 4 लाखांचा मिनी टेंपो (क्र. एमएच 10 बीआर 0240) असा एकुण 6 लाख 48 हजार रूपयांचा मुद्देमाल व मनोज सुरेश जाधव, मारूती सर्जेराव जाधव, रमेश सुरेश पिटेकर (सर्व रा. नामदेववाडी, सातारा) व दत्तात्रय शामराव साळुंखे (रा. पिलाणी) या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच हस्तगत केलेल्या शेळ्या तात्काळ दळवी यांच्या ताब्यात दिल्या.

या तपासकामी उपनिरिक्षक मच्छिंद्र पाटील, नीलेश गायकवाड, दीपककुमार मांडवे, पो. ना. प्रशांत चव्हाण, कॉ. सतिश पवार, केतन जाधव, विशाल जाधव, अमोल कणसे, संजय जाधव, समाधान जाधव यांनी सहभाग घेतला. पुढील तपास हवालदार मिलिंद कुंभार करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्री मकरंद पाटील यांचा पाठपुराव्यामुळे वाई तालुक्यात ‘जललक्ष्मी’ योजनेचे काम प्रगतिपथावर; 23 गावांमधील शेतीला मिळतोय लाभ
पुढील बातमी
फलटण तालुक्यात अवकाळीने ऊस, मका, कांदा, गहू पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; आ. सचिन पाटील यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश

संबंधित बातम्या