नगरपालिका निवडणुकीत एकजुटीने काम करून विजय मिळवावा - खासदार उदयनराजे; न्याय न मिळालेल्या कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी

by Team Satara Today | published on : 19 November 2025


सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी एकजुटीने काम करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. एकजुटीने काम केल्यास विजय आपलाच आहे, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील बैठकीत व्यक्त केला. मनोमिलनाच्या धर्माला जागताना काही लोकांना मी न्याय देऊ शकलो नाही. परंतु, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी ताकद कायमच राहील, अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे यांनी दिली .

उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद ॲड. दत्ता बनकर, निशांत पाटील तसेच सातारा विकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मागील काही राजकीय समीकरणांचा ॲड. बनकर यांनी आढावा घेऊन उदयनराजे भोसले यांना शहरातील मतदान केंद्र व एकूण मतदारसंख्या, प्रशासनाची तयारी याबाबतची माहिती दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘मनोमिलनाच्या संकेताप्रमाणे 50 जागांवर दोन्ही आघाड्यांनी आपापले उमेदवार दिले आहेत. हे सर्व उमेदवार भाजपचे एकदिलाने काम करणार आहेत. एकत्र काम केल्यानेच आपला विजय शक्य होणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान व्हावे या पद्धतीने सर्वांनी तयारी करावी.’’ फक्त दहा दिवस असल्यामुळेजास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे, भाजपने आणि विशेषतः सातारा पालिकेने नागरिकांना दिलेल्या सुविधांदर्भात लोकांना माहिती देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जावे, मतदानाचा टक्का वाढण्याबाबतही प्रबोधन करण्याच्या सूचना उदयनराजे यांनी दिल्या. मनोमिलनाच्या वाट्यात सातारा विकास आघाडीच्या पॅनलमध्ये तब्बल 18 महिला उमेदवार आहेत. त्याचे दमयंती राजेभोसले यांनी कौतुक केले. नारीशक्तीसुद्धा कुठेही कमी नाही, सर्व आव्हाने पेलण्यास ती सक्षम आहे. सभागृह कामकाज चालवताना त्यांनीसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर धडाडीने वाचा फोडावी, असे आवाहन दमयंतीराजे यांनी केले.

अपक्षांची बैठकीची चर्चा

मनोमिलनाच्या ५० उमेदवारांना तितक्याच अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्रपणे आव्हान दिल्याने येथील लढती रंगतदार होणार आहेत. भाजपच्या उमेदवारांना कोणताही मतविभागणीचा दगाफटका होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतच्या याद्या मागून घेत त्याबाबतचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारांना निरोप पोहचवण्याचे काम सुरू झाले आहे. निष्ठावंतांना न्याय न मिळाल्यामुळे नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरीच्या भडक्याचे वेगळे निकाल लागू नये म्हणून आतापासूनच काळजी घेतली जात आहे. दि. 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे पुढील दोन दिवसांत समन्वय सादून काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रवृत्त केले जाईल, असा अंदाज आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा विकास आघाडीच्या गोटात राजकीय सन्नाटा; नगराध्यक्षपदाच्या मानापमान नाट्याची नाराजी, खा. उदयनराजे यांच्या मनात आहे तरी काय ?
पुढील बातमी
सातारा तालुक्यात दोघांच्या आत्महत्या; शिवथर व शाहूपुरीतील घटना

संबंधित बातम्या