वडूज : स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रणजित सुरेश बुलुंगे (वय ३३, सुरूर, ता. वाई) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की रणजित बुलुंगे याला दोन महिने १९ दिवसांचा मुलगा (वेदांत) होता. तो मुलगा दत्तक देण्याबाबत त्याने पत्नीच्या माहेरीकडील लोकांशी चर्चा केली; परंतु त्यांनी वेदांतला दत्तक देण्यास विरोध केला. त्याचा राग मनात धरून बिदाल (ता. माण) येथील पत्नीच्या माहेरी २० जानेवारी २०१८ मध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रणजितने टॉनिकच्या बाटलीत विष मिसळून वेदांतला पाजले.
या खटल्यात सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप व एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
हा खटला चालवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉसिक्युशन स्क्वाडचे उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, जयवंत शिंदे, आमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.