नवी दिल्ली : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारत चॅम्पियन झाल्यानंतर दुबईमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कोणताही अधिकारी दिसला नाही. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या विजयानंतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी पीसीबीवर टीका केली आहे. माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबीच्या या वृत्तीवर अक्रम खुप नाराज दिसत होता.
2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलद्वारे झाली. यामुळे एक उपांत्य सामना पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आला. तर भारताचा उपांत्य सामना दुबईमध्ये झाला. भारताने दुबईमध्ये अंतिम सामनाही खेळला. टीम इंडियाच्या विजयानंतर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, पीसीबीचा कोणताही अधिकारी स्टेजवर दिसला नाही. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने यावर प्रश्न उपस्थित केले होते. आता अक्रमनेही टीका केली आहे.
अक्रमने पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचाही उल्लेख केला. अक्रम म्हणाला की, "अध्यक्ष साहेबांची तब्येत ठीक नव्हती. पण स्टेजवर पीसीबीचे कोणीही नव्हते. सुमैर अहमद आणि उस्मान तिथून आले होते. पण दोघेही दिसले नाहीत. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान होतो. म्हणून, जो कोणी अध्यक्ष साहेबांचे प्रतिनिधित्व करत होता, तो तिथे असायला हवा होता. त्याला स्टेजवर बोलावले नव्हते का?”
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर शोएब अख्तरनेही प्रश्न उपस्थित केले होते. त्याने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अख्तर म्हणाला, "भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पण मला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत होता. पण त्यांचे कोणतेही प्रतिनिधी तिथे दिसले नाहीत. हे जागतिक रंगमंच आहे. कोणी तरी तेथे पाहिजे होत.”