जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी नेत्यांची एकजूट, मग ऊसदरासाठी कधी?; रयत क्रांती संघटनेचा सवाल

ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार व नेत्यांनी एकत्र बैठक घेण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 22 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन बैठका घेत आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या कष्टातून जिल्ह्यातील सहकाराची चळवळ उभी राहिली, त्याच शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील नेते एकत्र का येत नाहीत? असा सवाल रयत क्रांती संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध अडचणींचा सामना करीत आहेत. शेतीसाठी वाढलेला उत्पादन खर्च, पशुखाद्याचे वाढते दर, पाणीटंचाई आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी सर्व नेते एकत्र बसू शकतात, तर शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी अशीच एकजूट का दाखवली जात नाही? असा सवाल रयत क्रांती संघटनेने केला आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांशी अनेक राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्व आमदार, साखर कारखान्यांचे पदाधिकारी तसेच प्रमुख राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन ऊसदराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, पहिली उचल जाहीर व्हावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.                                                        शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे
निवडणुका, राजकीय पदे आणि संचालकपदांच्या निवडीसाठी जशी एकजूट दाखवली जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही सर्व राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ‘शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे आणि ऊसदराची कोंडी फुटलीच पाहिजे,’ अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, प्रमुख राजकीय नेते आणि साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीतमतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य - विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
पुढील बातमी
लघु आयुर्वेदिक उद्योगांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ असावे; साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशनात मागणी

संबंधित बातम्या