बेळगाव : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव शहरातील ढोर गल्ली येथे मध्यरात्री घराला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत शारदा दमोने (४५), भारती रदमोने (५०), प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) यांचा मृत्यू झाला. तर गजानन दमोने (६५) आणि रोशन दमोने (२१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील फ्रीजचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
दरम्यान, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार असिफ सेठ, महापौर प्रीती खामकर, मनपा आयुक्त एम. कार्तिक, उपमहापौर तसेच भाजप नेते किरण जाधव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पीडित कुटुंबीयांना सरकारच्या पातळीवर आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे जारकीहोळी यांनी सांगितले. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगितले.
बेळगाव शहरातील ढोर गल्ली येथे फ्रीजचा स्फोट होऊन घराला आग; चार महिलांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा