ज्यांच्या मागे ताई, त्याला कोणी मारू शकत नाही

लाडक्या बहिणींसाठी पुढच्या अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

by Team Satara Today | published on : 18 August 2024


सातारा : ज्यांच्या मागे ताई, त्याला कोणी मारू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बहिणी एकत्र आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद म्हणजे आमच्या पाठीशी त्याची कवच कुंडलं असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात सांगितले. या महिलांची सेवा करण्यासाठी आता महायुतीला कोणीही थांबू शकत नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. काही सावत्र भावांनी न्यायालयात जाऊन या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न केला व ही योजना म्हणजे चुनावी जुमला अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कथनांना तुम्ही बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
साताऱ्यात महिला सन्मान योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, महिला केंद्रित योजना सातत्याने राज्य सरकार सुरू करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा महिलांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था संचलित होईल. काही सावत्र भाऊ देखील आहेत ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आधी या सावत्र भावांनी न्यायालयात जाऊन ही योजना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने ही योजना थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही. यामुळे त्या सावत्र भाऊंनी किती प्रयत्न केला तरी योजना थांबवू शकले नाही. त्यामुळे एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पोहोचले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे पोहोचतील. आम्ही कोणत्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माता-बहिणींच्या आशीर्वादाने पुढच्या बजेटला सुद्धा आम्ही भरीव तरतूद करणार आहोत आणि पुढचे बजेटही आम्हीच मांडणार आहोत. पुढच्या वर्षाचे पैसे देखील आम्ही ठेवणार आहोत, असा दावा फडणवीस यांनी करत महिलांना आश्वस्त केले. अर्थसंकल्पात पाच वर्षाच्या पैशाची तरतूद करता आली असती तर आम्ही ती देखील केली असती. आघाडीचे सरकार जर आले तर ते लाडक्या बहिणीचे पैसे थांबवतील. मात्र काळजी करू नका, पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार. तुमचे पैसे सुरू राहतील, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रामध्ये 12000 मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली आहे. त्यामुळे पुढील 18 महिन्यानंतर शेतकऱ्यांना बाराही महिने 365 दिवस दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत राहावे लागणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोडा घालणार्‍या सावत्र भावांना जोडा दाखवा 
पुढील बातमी
बहिणीच्या योजनेसाठी बँक खाते आधारशी लिंक करा

संबंधित बातम्या