मसूर : कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वादातून रविवारी सकाळी दोन गटांत झालेल्या हिंसक हाणामारीत सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या थराराने संपूर्ण परिसर हादरला असून, मसूर पोलिसांनी महिलांसह दहा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या कारणावरून जुना वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे पर्यवसान शिवीगाळ आणि जीवघेण्या हल्ल्यात झाले. संशयितांनी कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांचा वापर करत सूरज सूर्यवंशी याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रज्वल सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, यश सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी आणि रोहिणी सूर्यवंशी यांच्यावरही शस्त्रांसह दगडांनी हल्ला करण्यात आला, ज्यात ते जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सूरज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूचेही दोघे जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
प्रज्वल सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसूर पोलिसांनी श्रीमंत उर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन उर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन उर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, रेश्मा सूर्यवंशी, सुनिता सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, शालन सूर्यवंशी आणि विद्या सूर्यवंशी यांच्यावर खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी दुसऱ्या बाजूकडूनही परस्परविरोधी फिर्याद दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात मोठा फौजफाटा आणि श्वानपथक तैनात केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी मसूर पोलिस ठाण्यास भेट देऊन तपासाची माहिती घेतली. मयत सूरज हा स्थानिक विकास सोसायटीच्या सचिवपदी कार्यरत होता; त्याच्या निधनाने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. गावात शांतता राखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पुढील तपास मसूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात करत आहेत.
हेळगावात वाटेच्या वादातून रक्तरंजित थरार; तरुणाचा खून, महिलांसह १० जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा