हाणामारी व सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे पत्रकारांशी संवाद साधताना सातारमध्ये प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 19 July 2025


सातारा : सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून आमदारांना हाणामारी व सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न होता, असे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत पक्षाला सत्ता स्थान मिळवून देणार हे निश्चित, असा ठाम विश्‍वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर शशिकांत शिंदे प्रथमच सातार्‍यात आले. त्यांचे भव्य स्वागत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यावेळी पक्षाच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, दीपक पवार आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाकडून अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांसह सरकारच्या कामकाजातील उणीवा, जनतेच्या मनातील रोष जगजाहीर होऊ नये म्हणून सभागृहात व सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांना मारहाण करण्यात आली. सभागृहात मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यात आला. विरोधकांना दमदाटी करून त्यांचा आवाज दाबून सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी हाणून पाडला, असे शिंदे यांनी सांगितले. सरकारच्या कामात खूप उणिवा आहेत. सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये कोणताही समनव्य नाही. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मतदारसंघासह सर्वत्र अन्याय दादागिरी करत सत्ताधारी आमदार मतदार संघात अनेक अनधिकृत कामे करत आहेत. सगळीकडे नुसती बजबजपुरी सुरु आहे. एकूणच सरकार नाकर्ते झाले आहे.

कोणत्याही परिस्थितीत राज्यात त्रिभाषा सूत्र अंमलात आणू दिले जाणार नाही. हिंदी भाषेला विरोध कायम राहील, असे सांगून शिंदे म्हणाले, इतर राज्ये त्यांच्या भाषेला प्राधान्य व संरक्षण देत असताना हे राज्यकर्ते मराठी भाषा संपवायला निघाले आहेत. इथे उद्योगधंदे, रोजगार करण्यासाठी आलेले हिंदी भाषिक आणि परप्रांतीय मराठी माणसावर दादागिरी, अन्याय आणि अपमान करत आहेत. दिल्लीकरांच्या भीतीने सरकार त्यांना समज देत नाही. उलट त्यांना संरक्षण देत आहे.पण कोणत्याही परिस्थितीत ही हिंदी भाषिकांची दादागिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्र पेटून उठला तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असेही त्यांनी सांगितले.


पक्षाची पूर्ण ताकदीने बांधणी केली जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून लढविल्या जातील. त्या-त्या ठिकाणी अधिकार दिले जातील. आवश्यकता असल्यास स्वबळावर निवडणूक लढविली जाईल. सातारा जिल्ह्यात पक्षाची मोठी पिछेहाट झाल्याचे मान्य करून शिंदे यांनी स्थानिक तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून जुन्या नव्यांचा मेळ घालून पक्ष संघटना उभी केली जाईल. आवश्यक त्या ठिकाणी मोठे फेरबदल केले जातील, असे शिंदे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आकाशवाणी येथे रविवारी मोफत नेत्रचिकित्सा शिबीर
पुढील बातमी
शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे

संबंधित बातम्या