सातारा : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे अनावरण जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पाटील यांनी उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे कौतुक करुन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातर्फे संपूर्ण सप्ताहामध्ये 500 लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन वितरण करण्यात आले असून प्रातिनिधिक स्वरूपात 20 लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपालिकेजवळील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व संविधान उद्देशीकेचे वाचन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामाजिक समता सप्ताह कालावधीत विविध विषयावर व्याख्याने, महिला मेळावा, रक्तदान शिबीर, ज्येष्ठ नागरीक आरोग्य तपासणी व मेळावा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक समता सप्ताहाच्या शेवटच्या व्याख्यानमालेत राहुल गंगावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक धोरण व कार्य या विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने सुरू झालेल्या समता सप्ताहाला इथेच न थांबवता वर्षभर अशाच पद्धतीने त्यांच्या विचारांना वाहून घेण्याचे सर्व कर्मचारी आणि उपस्थिताना आवाहन केले.
कार्यक्रमासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार तसेच समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, विविध महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.