भुईंज : प्राचीन व वास्तुरचनेचा अद्भूत नमुना असलेले मंदिर आणि पौराणिक कथेचा ठेवा लाभलेल्या भुईंज येथील महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणि उत्साह ओसंडून वाहत असतानाच आज सुप्रभाती येथील मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श झाल्याने भाविकांनी या किरणोत्सव काळात एकच जयजयकार केला.
अगदी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून पूर्व दिशेला अर्ध्य देत भक्तांपासून ते सकाळी होणाऱ्या आरतीच्या मंगलमय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांच्या गर्दी आणि उत्साह दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यातच गुरुवारी सकाळी सहा वाजता महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविकांनी एकच जयजयकार केला. नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेत देवीच्या शिरावर व कपाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला, त्यावेळी चैतन्य आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवास मिळाला.
संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या प्राचीन घाटावर असलेल्या अखंड पाषाणातील महालक्ष्मी देवीचे मंदिर हे आजही वास्तुविशारद व शिल्पकारांच्या संशोधनाचा विषय ठरतो आहे. नुकताच थांबलेला पाऊस व नवरात्रोत्सवाच्या उत्साहाने कळस गाठला. त्यातच गुरुवारी सुरू झालेला हा सूर्यकिरणांचा अभिषेक सोहळा सर्वांनाच अलौकिक पर्वणीचा ठेवा मिळत आहे.