मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध

रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया

by Team Satara Today | published on : 07 August 2025


सातारा : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. जिल्हा कक्षाने मागील सात महिन्यांत 5 कोटी 87 लाख 99 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. देगाव येथील प्रविण ताटे व कसुंबी येथील सावित्री भिलारे यांना प्रत्येकी एक लाख रुपये कक्षाकडून मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीमुळेच   रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याच्या भावाना रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करित आहेत.

या कक्षाने केलेल्या मदतीबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत. या संदर्भात बोलताना प्रमोद घोरपडे हे रुग्णाचे नातेवाईक म्हणाले,माझा आतेभाऊ प्रविण ताटे हे अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यामुळे आम्ही त्यांना प्रतिभा हॉस्पीटल येथे घेऊन आलो. त्यानंतर त्यांची तब्बेत अचानक खराब झाल्यामु‌ळे डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल यासाठी 3 ते 4 लाख  खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.  माझ्या एका मित्राने  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची माहिती दिली. तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधला. सर्व माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर दोन दिवसात एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाली. मदतीमुळेच रुग्णावर लवकर उपचार होऊ शकले. आज रुग्ण ठणठणीत आहे, हे शक्य झाले ते मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामुळेच, असे रुग्णाचे नातेवाईक प्रमोद घोरपडे सांगतात.

मी आनंदा संपत भिलारे कुसंबी येथील असून माझी आई सावित्री संपत भिलारे यांना डॉक्टरांनी हिप रिप्लेसमेंट (खुब्याचा आजार) या आजाराबद्दल शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. त्याचा अंदाजे खर्च अडीच लाख होता. आपली परिस्थिती बेताची असल्याने सदर खर्च करणे शक्य नव्हते त्यावेळी मला मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल समजले त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात भेट दिली त्यांनी माझ्याकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात मला माझ्या आई करता एक लाख रुपये मंजूर झाल्याचा फोन आला. मला इतक्या तातडीने मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे आभार मानतो. गरजू, गरजवंत,  आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद भिलारे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात पेपरलेस व डिजीटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची गरज उरलेली नाही. 20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते, त्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय 2–6 वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया,  अपघात, मेंदूचे आजार, हृदयरोग, बालकांची शस्त्रक्रिया, नवजात शिशुंचे आजार त्यासोबतच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रूग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते.

आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, जिओ-टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1.60 लाखांपेक्षा कमी असावे), वैद्यकीय अहवाल व खर्चाचे प्रमाणपत्र, संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद त्यासोबतच अपघातप्रकरणी पोलीस डायरी नोंद आणि अवयव प्रत्यारोपण प्रसंगी झेडटीसीसी नोंदणी पावती असणे आवश्यक आहे.  

पेपरलेस प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान आणि जिल्हास्तरीय कक्षांमुळे गरजू रुग्णांना सहज मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता  कक्षामूळे रूग्ण व नातेवाईकांच्या अनेक आर्थिक समस्या सहज सोडविणे शक्य होत आहे.  अर्ज करण्यासोबतच वैद्यकीय आर्थिक मदत तातडीने मिळत आहे. तरी जिल्ह्यातील गरजु रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी मदतीसाठी भेट द्यावी.

वर्षा पाटोळे जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राधान्याने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
चीन मीडियाने भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर दिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या