सातारा : कोडोली, सातारा येथे पोलिसांनी छापा टाकून 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दोघांवर गुन्हा दाखल केला. संशयित दोघे सांगली शहरातील येथील आहेत.
प्रशांत प्रकाश देवकर (वय 35, रा. कुपवाड जि.सांगली), सुशांत दिनेश काळे (वय 20, शंभर फुटी रोड, सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुहास कदम यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. एमएच 09 एफबी 8842 या क्रमांकाच्या वाहनातून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पथक तयार करुन कोडोली येथे छापा टाकला. त्यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा होता. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमती 4 लाख 92 हजार रुपये होती. याशिवाय मोबाईल, कार असा मिळून 13 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा गुटखा बालाजी करली, पुणे याच्या फायद्यासाठी वाहतुक होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.