पर्यावरण संवर्धनासाठी हिरवाई संस्थेच्यावतीने शुक्रवारी सदरबाजार, सातारा येथे ‘हिरवाई सीड बॉल फेस्टिव्हल’

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : येथील पर्यावरण संवर्धनासाठी हिरवाई संस्थेच्यावतीने जागतिक वनदिनाचे औचित साधून शुक्रवार, दि. 20 मार्च रोजी सकाळी 8  ते 11  या वेळेत हिरवाई प्रकल्प, सदर बाजार, सातारा येथे “हिरवाई सीड बॉल फेस्टिव्हल” आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सातारा परिसरातील विविध शाळांमधील  विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून त्यांच्या हस्ते बीजगोळे तयार करण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थी साधारण 20 बीजगोळे बनवेल. बीजगोळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक पर्यावरणप्रेमी विद्यार्थिनी ईरा यादव हिच्या मार्गदर्शनाखाली दाखवण्यात येईल. त्यापैकी 10 बीजगोळे विद्यार्थी स्वतःकडे ठेवतील तर 10 बीजगोळे हिरवाई प्रकल्पासाठी जमा केले जातील. हे बीजगोळे पावसाळ्यात टेकड्या व मोकळ्या जागांवर पसरवले जाणार आहेत.

या उपक्रमात पालकांनीही आपल्या मुलांसोबत सहभागी व्हावे, जेणेकरून लहानपणापासूनच त्यांच्यावर निसर्ग संवर्धनाचे संस्कार होतील. मुलांसाठी ही निसर्गाशी जोडणारी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी एक सुंदर आठवण ठरेल.

बीजगोळे तयार करण्यासाठी लागणारी माती, शेणखत, बिया व पाणी यांची व्यवस्था हिरवाईत करण्यात आली आहे. तरीही शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना वेगवेगळ्या बिया व थोडी माती सोबत आणण्यास प्रोत्साहित करावे. जागतिक वनदिनानिमित्त हिरवाई प्रकल्पातील झाडांची ओळख करून देणारी छोटी जंगल सहल तसेच पर्यावरणीय प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.

सातारा परिसरातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाच्या या अनोख्या अनुभवाची संधी द्यावी, असे आवाहन हिरवाई संस्थेच्या वतीने प्रा. संध्या चौगुले यांनी केले आहे.  कृपया सर्वांनी आपापला जेवणाचा डबा, पिण्याचे पाणी व लेखन साहित्य सोबत आणावे. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊया.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

संबंधित बातम्या