हिंदू मंदिरांचे सरकारीकरण करू नये

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार यांची मागणी

by Team Satara Today | published on : 12 April 2025


सातारा : संपूर्ण देशातील हिंदू मंदिरे ही हिंदू धर्मियांच्या आस्थेची प्रतीक आहेत. मात्र महाराष्ट्रात या हिंदू धर्मीयांच्या प्रसिद्ध मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी सरकारचा हस्तक्षेप जास्त आहे. अशा मंदिरांना हिंदू धर्मीयांच्या हवाली करून त्यांच्या श्रद्धेला मुक्त वाव द्यावा आणि मंदिरांचे सरकारीकरण थांबवावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमारजी यांनी केली.

आलोक कुमारजी यांची अयोध्या येथे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय संघटन बैठकीत निवड झाल्यानंतर त्यांनी संत सेवा यात्रेचा प्रारंभ केला. नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील दौर्‍यानंतर सांगली वरून ते थेट सातार्‍यात दाखल झाले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे, डॉक्टर रवी कोठाळे, विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा मंत्री विजय गाढवे, कराड मंत्री संतोष देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आलोक कुमारजी म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संत सेवा यात्रा या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये हिंदू समाजाचे संघटन आणि सशक्तिकरण या प्रक्रिया महत्त्वपूर्ण पद्धतीने राबवल्या जात आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आयोध्येमधील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याच्या हेतूने जगातील सर्वात मोठे 44 दिवसाचे जनसंपर्क अभियान हाती घेतले गेले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास याची मान्यता मिळाल्यावर हे निधी संकलन अभियान संपूर्ण भारतात 15 जानेवारी 2021 ते 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत झाले. त्यातून एक हिंदू धर्मियांची आस्था असणारे मोठे मंदिर उभे राहिले. या माध्यमातून या मंदिर परिसरामध्ये हिंदू धर्मियांच्या आस्थेचा विषय असणारा राम दरबार ही भरवला जाणार आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या आगामी वाटचालीविषयी ते म्हणाले, महाराष्ट्रातील संत साहित्य आणि सेवापरंपरेला वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्रातील संत आणि मठाधिपती यांच्या गाठीभेटी घेऊन हिंदू धर्मियांची अस्मिता जोपासणे हिंदू संघटन वाढवणे आणि त्याचा प्रसार व प्रचार करणे इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले असून त्या माध्यमातून या यात्रेची वाटचाल सुरू आहे. या यात्रेचा समारोप पुणे येथे एका मोठ्या कार्यक्रमामध्ये होणार आहे.

हिंदू धर्मियांच्या आस्थेची प्रतीके असणारी मंदिरे ही सरकारच्या निर्बंधामध्ये आहेत. ज्या-ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून मंदिरे चालवली जातात, तेथे कोणतेही अधिकार मठाधिपती अथवा पुजार्‍यांना दिले जात नाहीत. त्याच्यामध्ये शासकीय अधिकार्‍यांचा हस्तक्षेप असतो. ती मंदिरे हिंदु धर्मियांच्या स्वाधीन करावीत, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्मियांवर अत्याचार होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, येथील सरकार वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. केंद्र शासनाच्या वतीने या संदर्भामध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दरवर्षी आठ ते नऊ हजार महिलांचे समुपदेशन करून त्यांना लव जिहाद प्रक्रियेपासून वाचवले जात आहे. हिंदू बांधवांची आपल्या धर्माप्रती असणारी श्रद्धा आणि अस्मिता वाढवणे, आपल्या परंपरांचे जतन करणे तसेच त्यांना प्रखर देशाभिमान जागृत करणे अशा विविध माध्यमांसाठी वेगवेगळे उपक्रम यापुढे सातत्याने राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अक्षय कुमारची जया बच्चन यांच्यावर टीका
पुढील बातमी
रयतच्या विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान उपलब्ध करणार

संबंधित बातम्या