सातारा : महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कृषीगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात या जनजागृती व सेवा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये हिंसाग्रस्त व पीडित महिलांना केंद्रातर्फे मोफत दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन तसेच तात्पुरत्या राहण्याची सोय यासारख्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व महिलांच्या मदतीसाठी असणाऱ्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकांची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा 'पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया, बालविवाह प्रतिबंध कायदा आणि मिशन शक्ती मोबाईल ॲप यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमास महिला सक्षमीकरण केंद्र विभागाच्या जिल्हा महिला समन्वयक मृण्मयी जाधव व अनुजा पवार, सखी वन स्टॉप सेंटरचे किरण साळुंखे, चाईल्ड हेल्पलाइन विभागाच्या केस वर्कर सुजाता शिंदे यांच्यासह केंद्राचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कृषीगंगा मार्गदर्शन केंद्रात सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाचे जनजागृती सत्र
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा