सातारा : एकभाषिक समाज एकत्र राहावा हा भाषावार प्रांतरचनेचा मूलभूत सिद्धांत होता. मात्र याबाबतीत दीर्घकाळ गोंधळाची व संघर्षाची परिस्थिती राहिली असून सीमा भागातील मराठी भाषिक लोक गेली ६४ - ६५ वर्षे सीमा प्रश्नाची भळभळती वेदना घेऊन उभे आहेत अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व अभिजात भाषा तज्ञ समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व खानापूर (जि. बेळगाव) येथील शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथे आयोजित विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पठारे बोलत होते. याप्रसंगी आमदार विठ्ठलराव हलगेकर, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई, अकादमीचे सीमा भागाचे समन्वयक गुणवंत पाटील, गोव्यातील कवयित्री चित्रा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे साहित्य संमेलन सीमा भागातच होत असल्याने स्वाभाविकच रंगनाथ पठारे यांच्या मुखातून सीमा बांधवांच्या वेदनांचा हुंकार उमटला. भाषा आणि साहित्य या एक प्रकारचा निवारा देणाऱ्या गोष्टी असतात. त्या निवाऱ्यामध्ये राहून आपण दुनियेशी व्यवहार करत असतो. मात्र तुम्ही एकमेकांच्या निवाऱ्याच्या बाहेर उभे आहात याच्याइतके दुःखद काय आहे ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
वादामुळे प्रदेशाचे हाल
एकभाषिक समाज एकत्र राहावा हा भाषावार प्रांतरचनेचा मूलभूत सिद्धांत होता. एकभाषिक समाज एकत्र असेल तर त्यांना त्यांचे व्यवहार आनंदाने करता येतील, दुसऱ्या भाषेचा आदर करता येईल. कारण कानडी भाषा आपली शत्रू नाही, तर भाषाभगिनी आहे. मात्र याबाबतीत दीर्घकाळ गोंधळाची व संघर्षाची परिस्थिती राहिली आहे अशी संयमित भूमिका त्यांनी मांडली. सीमाभागाचा हा परिसर निसर्गाने नटलेला असून, रमणीय व सुंदर आहे. पण, याच सौंदर्यामुळे दोन्ही राज्यांना या भागाचे आकर्षण आहे. त्यात या प्रदेशाचे हाल होत आहेत असे ते म्हणाले.
साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो. परंतु, सीमाभागात निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. मातृभाषेवर अनन्वित अन्याय होत आहे. तो केवळ मराठी भाषेवर होतोय असे नाही, तर कमी-अधिक प्रमाणात कानडीवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. इंग्रजीचे फॅड पसरले आहे. मातृभाषेऐवजी इंग्रजीतून शिक्षण घेणारी पिढी समाजापासून तुटत आहे. या पिढीचे भविष्यच कोमेजून जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मातृभाषेमुळेच मेंदूचा विकास
कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे पठारे यांनी स्पष्ट केले.
साहित्य मूल्याचा संस्कार करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर करण्याचे आत्मबळ साहित्य मिळवून देते. आदरभाव व मानवता ही मूल्ये आपल्यात साहित्यामुळे रुजली आहेत. साहित्य समाजाला जागृत करते. आपल्या जगण्यातील प्रश्न हेच साहित्याचे विषय आणि प्रश्न असायला हवेत. लेखक आपल्या सभोवती असणारी दुःखे आणि जगण्याचे पैलू मांडतो. मनुष्य म्हणून आपण सगळे एक आहोत. ही भावना साहित्याने वाढीस लावायला हवी, अशी अपेक्षाही पठारे यांनी व्यक्त केली.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, कलेतून विज्ञान जन्माला आले आहे. त्यामुळे, कोणत्याही कलेला कमी लेखू नये. सर्व समाजाचे हित साधते तेच खरे साहित्य आहे. मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांनी गुणात्मक शिक्षण देऊन मराठी संवर्धनाचा नवा पर्याय शोधला आहे. तसा प्रयोग खानापुरात होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी स्वागत केले. डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविकात गुंफणच्या साहित्य चळवळीतील योगदानाचा आढावा घेतला. उद्घाटन सत्रात चंद्रशेखर गावस (गोवा) यांना गुंफण साहित्य, एल. डी. पाटील (बिदरभावी, जि. बेळगाव) यांना गुंफण सामाजिक, प्रसिद्ध रंगकर्मी राजीव मुळ्ये (सातारा) यांना गुंफण सांस्कृतिक, संजय वेदपाठक (पुणे) यांना गुंफण सद्भावना, तर प्रकाश बेळगोजी (बेळगाव) यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
ग्रंथदिंडीने मंगलमय वातावरण
संमेलनाच्या निमित्ताने खानापूर येथील ज्ञानेश्वर मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत भव्य ग्रंथ दिंडी काढली होती. या ग्रंथ दिंडीने शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. त्यामध्ये प्रमुख मान्यवरांसह राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर, भजनी मंडळे, शिक्षक, विद्यार्थी - विद्यार्थिनी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. साहित्यिक संजीव वाटुपकर व प्रसिद्ध रंगकर्मी सुजीत शेख यांनी साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले.