ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by Team Satara Today | published on : 24 August 2026


 

पुणे : मराठी भाषा आणि व्याकरणाच्या ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापिका यास्मिन शेख यांचे सोमवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषा व व्याकरण विश्वातील एक मार्गदर्शक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे.  

​२१ जून १९२५ रोजी जन्मलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे होते. मूळच्या ज्यू धर्मीय असलेल्या शेख यांनी पुण्यातील सर परशुरामभाऊ (स. प.) महाविद्यालयातून मराठी विषयात विशेष प्रावीण्यासह पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाषाशास्त्र व व्याकरणाचा सखोल अभ्यास केला होता.  

​त्यांनी मुंबईतील शीव येथील 'एसआयईएस' महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका तसेच विभागप्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली. याशिवाय प्रशासकीय सेवा पूर्वतयारी संस्थेमध्ये (SIAC) स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी भाषाशास्त्राचे मार्गदर्शन केले. 'बालभारती'च्या पाठ्यपुस्तक निर्मितीत व संपादन कार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे ग्रंथ अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.  

​मराठी प्रमाणभाषेचे जतन आणि शुद्धलेखनाचे नियम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या आयुष्यभर कार्यरत राहिल्या. महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कारा'सह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन कन्या व परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘वाढदिवस माझा-आनंद त्यांचा’ उपक्रमातून जकातवाडी आश्रमशाळेतील १०० चिमुकल्यांना ब्लँकेट व शैक्षणिक साहित्याची भेट

संबंधित बातम्या