सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग, पुणे विभाग व नागपूर विभाग या पदवीधर तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग या शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून सदर निवडणुकीचे मतदान शुक्रवार दि. २३ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते सायं.४ पर्यंत होणार आहे.
या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी येण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर व शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर केलेली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
तसेच सदर निवडणूकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना सदर विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. याकरीता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स, इत्यादी) या मधील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी मतदान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २ तासांची विशेष सवलत देण्यात यावी. याबाबतची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालक, व्यवस्थापकांनी वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूरी अथवा २ तासांची विशेष सवलत प्राप्त न झाल्याने मतदारास मतदान करता येणे शक्य न झालेस किंवा मतदानापासून वंचित राहिल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल.
सर्व कामगार मतदारांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, आस्थापनेने मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, केशव सोना कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, सातारा दुरध्वनी- ०२१६२- २३३०८४ ई मेल- aclsatara@gmail.com या पत्त्यावर तक्रार दाखल करण्यात यावी, ही विनंती.
२३ ऑक्टोबर रोजी पदवीधर व शिक्षक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष सवलत; मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा