'आर.के. ट्रेडिंग'वर शाहूपुरी पोलिसांचा छापा ; मुख्य आरोपी रोहित काठाळे फरार

​सातारकरांचे कोट्यवधी बुडवून ठगसेन परदेशात पळाल्याची चर्चा; राजकीय नेते आणि पोलीसही जाळ्यात?

by Team Satara Today | published on : 06 January 2026


सातारा: आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सातारकरांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या 'आर.के. ट्रेडिंग कॅपिटल'च्या कार्यालयावर शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देत मुख्य सूत्रधार रोहित काठाळे हा यापूर्वीच फरार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी छापा टाकला असता, राजवाडा येथील कार्यालयाला 'कुलूप' असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.​सोमवारी कुणाल पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली होती. पवार यांची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने रोहित काठाळे याच्यावर गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी राजवाडा परिसरातील त्याच्या कार्यालयावर धाड टाकली, मात्र तोपर्यंत आरोपीने पोबारा केला होता.​फसवणूक झालेल्यांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नाहीत, तर शहरातील काही बड्या राजकीय असामी आणि खुद्द पोलीस दलातील काही कर्मचारीही या जाळ्यात अडकल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. रोहित संकपाळ, सागर गोखले, ओमकार भिसे यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांनी फसवणुकीचे लेखी अर्ज दाखल केले आहेत. घोटाळ्याची व्याप्ती पाहता हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक? 'मिसिंग'च्या नाटकाने संशय वाढला!
​रोहित काठाळे हा सप्टेंबरमध्येच पळून गेला असताना, त्याच्या घरच्यांनी तब्बल १५-२० दिवसांनी तो 'मिसिंग' (बेपत्ता) असल्याची खोटी तक्रार दाखल केली. हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि रोहितला पळून जाण्यासाठी वेळ मिळवून देण्याचा 'बनाव' होता, असा गंभीर आरोप फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी केला आहे.काठाळे याने साताऱ्यासह पुणे, मुंबई, सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांना चुना लावून जमा झालेली माया घेऊन परदेशात पलायन केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तपासाची चक्र वेगाने फिरवून त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखेर ऑक्सफर्ड प्रकाशनाने घासले नाक; खासदार उदयनराजेंची जाहीर माफी!
पुढील बातमी
पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा - पालकमंत्री शंभूराज देसाई; पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाचा आढावा

संबंधित बातम्या