शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव

यादव यांनी दिला राजीनामा

by Team Satara Today | published on : 08 October 2024


सातारा : सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची माहिती मिळाली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या ‘अविश्वास’ व ‘राजीनामा’ घटनांनी जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गत आठवड्यातच सातारा शिक्षक बँकेचा शताब्दी महोत्सवी कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात सातार्‍यात संपन्न झाला. या कार्यक्रमात संचालकांसह अनेकांना डावलल्याची किनार या उलथा पालथीला कारणीभूत असल्याचे शिक्षक सभासद वर्तुळात चर्चिले जात आहे. सध्या बँकेत संघ व समितीची एकत्रित सत्ता असून चेअरमन पदे आलटून-पालटून मिळत होती. किरण यादव हे समितीच्या वतीने चेअरमन झाले व शताब्दी महोत्सव व इतर कार्यक्रमांची नियोजन झाले, यात संचालकांची मते विचारात न घेता एककल्ली कारभारामुळे असंतोष आधीच धुमसत होता, असे अंतर्गत गोटातून कळते. समिती व संघाचे मिळून 18 संचालक असले तरी त्यातील समितीच्या 5 जणांनी यादव यांच्या सोबत राहण्याचे ठरवले तर विरोधातील पुस्तके प्रणित संघाच्या तीनही संचालकांनी गेल्या काही महिन्यातील कारभारामुळे संघ व समितीच्या संचालकांशी मिळते जुळते घेतले. यानंतर सर्वांनी एकत्र येत किरण यादव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार 7 रोजी या 15 संचालकांची बँकेत बैठक होऊन अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. दरम्यान याबाबतची कुणकुण यादव यांना लागलेली होती. त्यामुळे नंतर त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कळते.

यादव यांच्यावरील अविश्वास ठरावावर बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, विद्यमान व्हाईस चेअरमन शहाजी खाडे, संचालक विजय बनसोडे, महेंद्र जानुगडे, विजय शिर्के, सुरेश पवार, नितीन राजे, तानाजी कुंभार, ज्ञानबा ढापरे, विजय ढमाळ, सौ. निशा मुळीक, नितीन काळे, संजीवन जगदाळे, संजय संकपाळ या 15 जणांच्या सह्या आहेत.

बँकेत समितीचे चेअरमन असतानाच्या काळात काही गैरनिर्णय झाले, ते अनेक संचालकांना पसंत नव्हते. समितीचे नेते उदय शिंदे यांचा बँकेच्या कामकाजात होणारा वाढता बाह्य हस्तक्षेप संचालकांमध्ये रोष निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे. शताब्दी वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एककल्ली पणाने निर्णय घेणे, संचालकांच्या मतांना किंमत न देणे व इतर काही बाबी याला जबाबदार असल्याचे बँकेच्या संचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा
पुढील बातमी
मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी

संबंधित बातम्या