सातारा : शेअर मार्केट एजंट असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये 10 महिने पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची 68 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विश्वनाथ प्रभाकर शेट्टी (रा.रामाचा गोट, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जयसिंह राज शेडगे (वय 34, रा. पंताचा गोट) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणूकीची ही घटना दि. 12 जून 2023 ते 6 जुलै 2026 या कालावधीत घडली आहे. संशयिताने शेअर मार्केट एजंट असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. शेअर मार्केटमधील सर्व माहिती असल्याचे भासवून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास एक वर्षाच्या आतच ज्यादा नफा मिळवून देतो, असे भासवले. त्यानुसार तक्रारदार यांनी 7 लाख रुपये संशयिताकडे गुंतवले. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांच्या प्रमाणेच आणखी 5 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तक्रारदार एकत्रित आले व त्यांनी विश्वनाथ शेट्टी याने 68 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत.