शिक्षण उपसंचालक चोथे रमले कुमारांच्या साहित्यिक भावविश्वात

वाय. सी. महाविद्यालयामध्ये 'शब्दसौरभ कुमार साहित्य संमेलन' कार्यशाळेचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 26 September 2025


सातारा : विचारांच्या माध्यमातून शब्दांचा सुगंध पसरत असतो. मुलांना शब्दांशी खेळता आलं पाहिजे. मन ज्यावेळी भरतं तेव्हा कविता जन्माला येते. त्यासाठी अगोदर माणसाकडे संवेदनशील मन असावं लागतं. कुमार वय हे जास्त संवेदनशील असतं आणि हेच वय संस्कारक्षमदेखील असतं. या वयातच मुलांवर वाचनाचे, लेखनाचे संस्कार व्हावेत, असे प्रतिपादन कोल्हापूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले. 

सातारा येथील रयत शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आयोजित शब्दसौरभ कुमार साहित्य संमेलनाच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांमधून उत्तमोत्तम लेखक घडावेत, त्यांची लेखणी जोमाने फुलावी, मुले पुढे यावीत, त्यांच्या हातून दर्जेदार साहित्य निर्मिती व्हावी, त्यांच्या विचारांना आणि प्रतिभेला व्यासपीठ मिळावे या दृष्टीने वाय‌. सी. महाविद्यालयामध्ये बुधवार (ता. २४) रोजी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारांचे साहित्य संमेलन हा दर्जेदार आणि सुनियोजित उपक्रम राबविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्यासह उपप्राचार्य एन. टी. निकम, पर्यवेक्षिका व्ही. एम. वाळवेकर, एन. ए. पाटील, डॉ. एल. एन. घाटगे, प्रा. गुरुसिद्थ शेळके, डॉ. शुभांगी कुंभार, प्रा. स्वाती नष्टे यांच्यासह सिद्धहस्त लेखक, कवयित्री यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक कमिटी चेअरमन प्रा. सत्वशीला काळे यांनी केले.

विद्यार्थ्यांना मुक्तपणे आपले स्वानुभव व विचार शब्दबद्ध करता यावेत, त्यांना साहित्यिकांच्या संपर्कात राहता यावे, त्यांच्या अभिव्यक्तीला हक्काचे सृजनशील व्यासपीठ लाभावे यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेली ही कार्यशाळा आदर्शवत असल्याचे सांगून आयोजकांचे शिक्षण उपसंचालक श्री. चोथे यांनी कौतुक केले आणि नवोदित लेखक-विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. दस्तुरखुद्द शिक्षण उपसंचालक आणि निमंत्रित लेखक, कवयित्री यांनी मांडलेले साहित्यविषयक चिंतनशील विचार, सादर केलेले विडंबन काव्य, ओव्या, उखाणे, कथाकथन सादरीकरणामुळे उद्घाटन कार्यशाळेला रंग चढला. 

प्रा. शिवाप्पा पाटील यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. भाषा विभाग प्रमुख प्रा. आर. आर. खोत यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. बी. खिलारे, प्रा. एच. ए. खाटमोडे, प्रा. एस. एस. मांडके, प्रा. सतीश सोनवणे, प्रा. शिल्पा बाबर, प्रा. निशा ढाणे, प्रा. दीपिका निर्वाण, प्रा. विशाखा कणसे, प्रा. जयश्री जकाते यांनी पुढाकार घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे जिल्ह्यातील ओबीसी जातींचा एल्गार
पुढील बातमी
अहिल्यानगरच्या बाधित भागांचा शंभूराज देसाई यांनी अनवाणी फिरत शेतकऱ्यांचा बांध गाठला

संबंधित बातम्या