दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचा कर्णधार होता. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघ फक्त उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला. याचदरम्यान अशा परिस्थितीत आता त्याने वन डे कारकिर्दीमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. मात्र आता तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याचे स्टीव्ह स्मिथने म्हटलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते स्मिथ कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल.तसेच दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या संघसहकाऱ्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली आणि म्हटले की, खेळातून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे.
स्मिथने म्हटले आहे की, “हा एक विलक्षण प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. खूप छान क्षण आणि उत्तम आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक विलक्षण कामगिरी होती, तसेच हा प्रवास शेअर करण्यासाठी अनेक उत्तम सहकाऱ्यांसह. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी लोकांसाठी आता एक उत्तम संधी आहे, त्यामुळे असे वाटते की आता खेळातून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट अजूनही प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, हिवाळ्यात वेस्ट इंडिज आणि नंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. मला वाटते की त्या टप्प्यावर माझे योगदान देण्यासारखे अजूनही बरेच काही आहे.”
२ जून रोजी ३६ वर्षांचा होणारा स्टीव्ह स्मिथने १९ फेब्रुवारी २०१० रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि ४ मार्च २०२५ रोजी भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. या १५ वर्षांत त्यांनी अनेक कामगिरी केल्या. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी केली नाही कारण त्यावेळी त्याला फिरकी गोलंदाज म्हणून जास्त पसंती दिली जात होती. त्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. तर, भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली होती.
डावखुरा फलंदाज स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी १६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १५३ डावांमध्ये तो एकूण ५७२७ धावा करण्यात यशस्वी झाला. त्याचा सर्वोच्च धावसंख्या १६४ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी ४३.०६ आहे, तर स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७.१३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतके आणि ३४ अर्धशतके आहेत. तो २० वेळा नाबाद परतला आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१७ चौकार आणि ५७ षटकार मारले आहेत.