सातारा : आपण भारतीय असल्याचा एक वेगळा अभिमान आणि आनंद प्रत्येकालाच असतो. आपल्या देशावर असलेले आपले प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवून या अभियानात सहभाग घ्यावा. या अभियानामुळे सर्वांचेच देशप्रेम वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी तिरंगा लावण्यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले असून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील मोती चौक येथे नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात 1000 तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय बनकर, भाजप सातारा विधानसभेचे प्रमुख अविनाश कदम, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस कास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळ, अविनाश खर्शीकर, मारुती चिकणे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी , सातारा नगरपालिकेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक, सातारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.