सातारा : मसाप शाहूपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे यावर्षी प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण सोमवार दि.२८ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे सोमवारी दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
सातारच्या साहित्यक्षेत्राला संजीवनी देणाऱ्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या १३ वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाखेतर्फे साहित्य पुरस्कार योजना सातारा जिल्हयातील उत्तम साहित्यकृतींना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार प्रथम वर्षीचा ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार आणि इतर पुरस्कार विजेते घोषित करण्यात आले होते. या पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी श्री. छ.थोरले प्रतापसिंह महाराज ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार विद्या पोळ-जगताप यांच्या 'बाय ग' या कादंबरीस, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार पदमाकर पाठकजी यांच्या 'रंग प्रेमाचे- बदलत्या काळाचे' या कथासंग्रहास, बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार निलेश महिगावकर यांच्या 'लास्ट इयरची वही' या कवितासंग्रहास, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार डॉ. मोहन सुखटणकर यांच्या निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श भाग १ व २ या साहित्यास जाहीर करण्यात आला होता. सर्व पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष विक्रम पाटील, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, शाहूपुरी शाखेच्या सदस्यांनी केले आहे.