शिरवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; विनापरवाना देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक; नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम

by Team Satara Today | published on : 10 May 2026


सातारा  : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत एका तरुणाला विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. तेजस राजेंद्र मोटे (वय २०, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भुईंज व शिरवळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा नियोजित असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रांचा शोध, गस्त आणि गुप्त माहिती संकलन मोहीम राबविण्यात येत होती.

दरम्यान, दिनांक ८ मे २०२६ रोजी एका व्यक्तीकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले.

या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार अधिनियम १९५९ मधील कलम ३(१), २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १२ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव यांच्यासह सचिन वीर, सुरज चव्हाण, बोराटे, मोझर, अरविंद बान्हाळे, भाऊसाहेब दिघे आणि अक्षय नेवसे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला; बालविवाह थांबवण्यात यश, पोलीस, महिला व बाल विकास विभाग, चाईल्ड लाईनची कारवाई
पुढील बातमी
समाजासाठी झोकून देऊन काम करणारांसाठीच सातारा भूषण पुरस्कार - दत्तप्रसाद दाभोलकर; माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान

संबंधित बातम्या