सातारा : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 12 मार्च 2025 रोजी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीत विद्यापीठात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम, मराठी भाषा व अन्य भारतीय भाषांचे शिक्षण याबाबत माहिती देण्यात आली. विद्यापीठातील विविध पायाभूत सेवा सुविधा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, गुणवत्ता सुधार, विद्यापीठाद्वारे राबविले जाणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, विदेशी भाषा प्रशिक्षण व्यवस्था, माजी विद्यार्थी संघटनांचा विद्यापीठ विकासात सहभाग, आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम यांबाबत आढावा घेतला. विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कामकाज उत्तमरीत्या सुरू असून विद्यापीठाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
विद्यापीठाची स्थापना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार या अंतर्गत झालेली असून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यापीठास ५५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता परंतु सदर निधी विद्यापीठास देण्यात आलेला नाही, सदर निधी विद्यापीठास मिळवून देण्यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जातील अशी हमी देखील या बैठकीत देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयातील रिक्त जागांच्या भरतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून सदर रिक्त जागांची भरती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली.
सदर बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के ,प्रभारी कुलसचिव प्रा डॉ विजय कुंभार व संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) प्रा डॉ. महेंद्र अहिरे, राज्यपाल कार्यालयातील अधिकारी विकास कुलकर्णी व उमेश काशीकर हे उपस्थित होते.