सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : शहरालगत असणारे पण कायम दुर्लक्षित ठरलेले शाहूपुरीकडे मी विशेष लक्ष दिले आहे. शाहूपुरीच्या विकास कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात मी कुठेही मागे हटणार नाही, असा शब्द सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
शाहूपुरी येथील प्रभाग क्रमांक 10 क्रांती हाउसिंग सोसायटीमार्फत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना युवा नेते विश्वतेज बालगुडे म्हणाले, ‘आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्नपूर्वक सातारा नगरपालिकेची हद्दवाढ मंजूर करून घेतली. केवळ हद्दवाढ करून न थांबता त्यांनी यात नव्याने समाविष्ट झालेल्या विस्तारित सातार्यातील शाहूपुरीसारख्या भागात विकास कामांसाठी भरघोस निधी देवुन भागाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न केला.’
दरम्यान, 20 वर्षे जुनी झालेली पाईपलाईन वाढीव पाइपलाइन निधीतून बदलण्यात आल्याने रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. गेंडामाळ नाका ते फाशीचा वड या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. उर्वरित रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण करणार असल्याचा शब्दही यावेळी देण्यात आला. यावेळी नगरविकास आघाडीचे नेते, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, युवा नेते अक्षय जाधव, क्रांती हाउसिंग सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.