पारगाव-खंडाळ्यानजीक कमान तुटल्याने ट्रक रस्त्यातच अडकला; महामार्गावर साडेपाच तास वाहतुकीचा खोळंबा

by Team Satara Today | published on : 10 August 2026


खंडाळा : पारगाव-खंडाळ्यानजीक महामार्गावरील उड्डाणपुलाजवळील दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा रविवारी कहर झाला. खड्ड्यांमुळे ३० टन स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या मालट्रकचा मागील टायर फुटून कमान तुटल्याने ट्रक रस्त्यातच अडकला.

परिणामी, पुणे-सातारा महामार्गावर साडेपाच तास वाहतुकीचा खोळंबा झाला. पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या, तर साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूकही खंडाळ्यापासून वेळे गावापर्यंत ठप्प झाली.

वीकेंडमुळे रविवारी महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरकडे ३० टन वजनाचे स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा मालट्रक पारगावनजीकच्या उड्डाण पुलाजवळील सेवा रस्त्यावरून जात होता. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यातून वाहन जात असताना धक्का बसल्याने ट्रकचा मागील टायर फुटला आणि कमान तुटली. त्यामुळे हा अवजड ट्रक जागेवरच बंद पडला. ट्रक रस्त्यात अडकल्याने काही वेळातच वाहनांची गर्दी वाढू लागली.

पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या पारगावनजीकच्या उड्डाणपुलापासून तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. ट्रक, बस, कार आणि अन्य वाहनचालकांना तासन्‌ तास एकाच ठिकाणी थांबून राहावे लागले. प्रवासी, महिला, लहान मुले आणि वृद्धांचे या कोंडीमुळे मोठे हाल झाले. वाहतूक कोंडीची तीव्रता वाढत असल्याने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेला मालट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. साडेपाच तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

पारगाव बसस्थानकापासून खंडाळा रेस्ट हाऊसमार्गे छोटी वाहने वळवून घाटाच्या दिशेने सोडण्यात आली. या पर्यायी मार्गामुळे महामार्गावरील वाहतुकीचा काही प्रमाणात ताण कमी झाला. मात्र, संध्याकाळी पाचनंतर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या पुन्हा वाढली. उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने जाऊ लागली आणि पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली. खंडाळ्यापासून वेळेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास धरणाचे ओटीभरण; आगामी काळात सातारा शहरासह हद्दवाढ भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा संकल्प - नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर यांची माहिती
पुढील बातमी
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ १२.२३ टीएमसी पाण्याची गरज; धरण ८८.३८ टक्के भरले

संबंधित बातम्या