उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा बारामतीत निषेध; राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन

by Team Satara Today | published on : 05 August 2026


बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या एका वक्तव्याचा निषेध करत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भिगवन चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान निषेधाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर टीका करत सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका ही तथ्यहीन असून, राजकीय वैफल्यातून करण्यात आल्याचा आरोप केला. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या महिला नेतृत्वावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करून राजकारणाची पातळी घसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.

राजकीय मतभेद असले तरी महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना साजेसे नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. काँग्रेसने देशाला अनेक सक्षम महिला नेते दिले असून, त्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार यांच्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या कार्याच्या आधारे व्हावे, वैयक्तिक टीका करून राजकीय संस्कृतीचा अवमान करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. भविष्यात महिला नेतृत्वाचा अवमान करणारी कोणतीही वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' उल्लेखावर, "मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन"- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुढील बातमी
अभिजित दीपकेंच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टी'च्या कोअर कमिटी बैठक सुरू; '६ ऑगस्टला पत्रकार परिषदेत होणार निर्णयांची घोषणा, राजकीय वर्तुळाचे लक्ष

संबंधित बातम्या